fbpx

मला थेरपी ची गरज आहे हे पालकांना कसे पटवून द्यावे ?

आताची पिढी मेंटल हेल्थ बद्दल जागरूक आहे. जेव्हा ते मानसिक त्रासात असतात तेव्हा थेरपी घेण्याची इच्छा सुद्धा होते पण आपले पालक आपली समस्या समजून घेतील का ? हा प्रश्न त्यांना अनेकदा पडतो, पालकांना सगळं सांगितली तरीही असे काहीच नसते, तू मोबाईल जास्त वापरू नकोस, तुला काय वेड लागले नाहीये अशी असंबद्ध उत्तरे मिळतात. आजच्या लेखात अशा परिस्थितीत पालकांना कसे समजवावे यावर आपण माहिती घेऊ.

मला साधारण 8 दिवसांपूर्वी एका 17 वर्षीय मुलाचा मेसेज आला, तो म्हणाला ” सर, माझ्यामते मला डिप्रेशन आहे, कुठेही माझे लक्ष लागत नाही. पण जेव्हा मी माझ्या आईला हे सांगितले तेव्हा तिने मला जेवण पोट भर करायला सांगितले, मी हिम्मत करून बाबांकडे गेलो ते त्यांनी सांगितलं की हे या वयात होत असत. तू पौगंड अवस्थेत आहेस म्हणून मूड स्विंग होत आहेत. मी त्यांना नेमके कसे समजावू की मला काय होत आहे ? आणि मला मदतीची गरज आहे.”

या मेसेज नंतर मी सुन्न झालो, आजच्या या टेक्निकल युगात सर्व माहिती मुबलक प्रमाणात एका क्लिक वर उपलब्ध असताना देखील सुज्ञ पालक मानसिक स्वास्थ्य या विषयाला अजिबात महत्त्व देत नाही हे पुन्हा एकदा जाणवलं.

मी सुद्धा 17 वर्षाचा होतो तेव्हा माझी प्रिय व्यक्ती काही कारणांनी माझ्यापासुन दुर झाली, मी थोडा डिप्रेशन मध्ये होतो. घरी तिच्या बद्दल माहीत होते, माझी परिस्थिती त्यांना जाणवत होती पण मानसिक समस्येवर थेरपी/ उपचार घेणे हे त्यांना अयोग्य वाटत होते, त्यांच्या मते हे सर्व आपोआप ठीक होते, थोडे चित्रपट पाहिले, मित्र किंवा परिवारासोबत बाहेर गेलो की मी तिला विसरून जाईन. पण हे असे शक्य नव्हते. याच परिस्थिती मुळे मला या धक्क्यातून सावरायला जास्त वेळ लागला आणि ही परिस्थिती गुंतागुंतीची झाली.

मानसिक समस्यांबद्दल असलेल्या या परिस्थती साठी पुढील 3 गोष्टी जबाबदार आहेत.
✳️ मानसिक स्वास्थ्य आणि थेरपी याबाबत समाजात असलेले गैरसमज, लोकांची कलुषित मते
✳️ मानसिक समस्या अस्तित्वात नाहीत हा समज
✳️ लोक काय म्हणतील किंवा उपचार घेणाऱ्याला वेडा समजतील ही भीती.

पालकांना या परिस्थिती मध्ये थेरपी साठी तयार करायला निश्चित मार्ग नाही पण पुढील काही मार्ग वापरून आपण त्यांचे मन बदलू शकतो.

❤️ पालकांशी मनमोकळे बोला –

पालक आपल्याला समजून घेणार नाहीत या भीतीने आपण त्यांच्याशी बोलणे टाळतो, तर सर्वात आधी ते काय विचार करतील हे सर्व डोक्यातून बाहेर काढा आणि त्यांच्याशी मनमोकळे बोला. कधी कधी एकदा बोलून पूर्ण विषय समजणार नाही, अश्यावेळी दोन तीन वेळा विषयावर चर्चा करावी लागेल. यासाठी तुम्ही खालील सोपे पर्याय वापरू शकता.

✳️ तुम्हाला येणाऱ्या समस्या व्यवस्थित समजवा.

तुम्हाला त्रास देणारी मानसिक समस्या ही तुमचे दैनंदिन आयुष्य कसे खराब करत आहे हे त्यांना व्यवस्थित सांगा. बरेचदा आपल्याला येणाऱ्या समस्या या वयामुळे आहेत असा त्यांचा समज होतो, जशी आपल्यावर असणारी जबाबदारी वाढेल तशी या समस्यांची तीव्रता कमी होईल असा त्यांचा समज असतो. त्यामुळे योग्य प्रकारे समस्या मांडा.

उदा.
▪️आई, मला अभ्यासात मन एकाग्र करण्यात अडचण येत आहे, मला सतत होपलेस वाटत असते. मला कुणाशी तरी बोलून यावर उपाय हवे आहेत.
▪️ बाबा, मला सतत हाथ धुवावे वाटतात, प्रत्येक गोष्ट अस्वच्छ आहे असे वाटते. मी सगळं  करून पाहिले, मला उपचाराची गरज आहे असे वाटत आहे.

✳️ पालकांसोबत माहिती शेअर करा.

आपण आजाराबद्दल सांगताना तू आम्हाला शिकवू नकोस, खूप मोठा झाला आहेस का ? अशी वाक्ये पालक वापरत असतील तर त्यांना मानसिक आजार आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर असलेले लेख, माहिती वाचायला द्या.

माझे लेख छापून त्यातील महत्वाचे मुद्दे, तुमची लक्षणे हायलाईट करून पालकांना द्या. मोबाईल वर लेखाचे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप करा. लिंक त्यांना द्या. ही परिस्थिती लवकर बदलणार नाही पण यातून थोडा थोडा फरक बदल होईल आणि आपला मुलगा/मुलगी कोणत्या परिस्थिती मधून जात आहेत हे त्यांना समजेल.

✳️ सर्वच माहिती शेअर करू नका.

काही अशा घटना किंवा गोष्टी असतात ज्या तुम्ही पालकांना सांगू शकत नाही, जर तुम्हाला पालकांना कोणतीही गोष्ट सांगताना सुरक्षित वाटत नसेल तर ती माहिती नाही सांगितली तरी चालेल. त्यांना छोटी उदाहरणे देऊन हे तुम्ही पटवून देऊ शकता.

उदा.
▪️ मला मान्य आहे की मी तुमच्यावर विश्वास ठेवून सर्व सांगायला हवे, पण मला स्पष्ट सांगता येत नाहीये मला थेरपिस्ट सोबत बोलणे सोपे होईल.
▪️ समजा माझा हात तुटला असेल तर तुम्ही तो स्वतः ठीक करणार का ? नाही ना. मला तुम्ही डॉक्टर कडे घेऊन जाल, तसेच आताची माझी परिस्थिती ही थेरपिस्ट च समजून घेऊ शकतात मला त्यांचेकडे घेऊन चला.

नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता, तुमच्या पालकांना किंवा मित्रांना काहीही वाटत असले तरीही तुम्हाला ज्या काही समस्या येत आहेत किंवा काही चुकीचे वाटत आहे तर तुम्ही तातडीने तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. तुम्हाला जर कुणी ट्रीटमेंट घेण्यासाठी परावृत्त केले तर गोंधळून जाऊ नका.

❤️ एक छोटीशी टीम बनवा.

आपण पालकांना समजावयाचे कितीही प्रयत्न केले तरीही पालक त्यांचे मत बदलत नाहीत अश्यावेळी पुढील मार्ग वापरून पहावेत.

✳️ परिवारातील प्रिय व्यक्ती सोबत बोलून बघा

आपल्या परिवारातील अन्य सदस्य जसे ताई, दादा, काका, मावशी, आत्या, आजी, आजोबा यांसोबत बोलून बघा त्यांना तुमचे प्रोब्लेम समजावून सांगा. याची सुरुवात करताना  त्यांचा सल्ला घेत आहात असे दर्शवा.

उदा. ताई, मला काही दिवसांपासून अभ्यासात लक्ष देण्यात अडचण येत आहे, एकदम hopeless वाटत आहे, आई सोबत बोललो पण तिने काही समजून घेतले नाही. तुला काय वाटतं मी थेरपिस्ट ची मदत घ्यायला हवी का ?

✳️ शिक्षण किंवा कोच यांची मदत घ्या.

आपल्या शिक्षकांना विश्वासात घेऊन आपली अडचण सांगा आणि पालक त्या बाबत कसे उदासीन आहेत ते समजवा. अनेकदा पालक हे शिक्षकांचे किंवा कोच यांचे म्हणणे सहज ऐकतात.

✳️ फॅमिली डॉक्टर सोबत बोला.

आपले फॅमिली डॉक्टर सोबत मानसिक समस्या आणि त्याची लक्षणे मांडल्यास ते आपल्या पालकांना आपल्याला थेरपिस्ट ची गरज आहे हे पटवून देवू शकतात, एवढेच नाही तर ते चांगला थेरपिस्ट सुद्धा सुचवू शकतात.

❤️ एकला चालो रे.

वरील दोन्ही पर्याय जर अयशस्वी झाले तर मग आपल्याला स्वतःसाठी उभे राहणे हाच पर्याय उरतो. नंतर थेरपिस्ट तुमच्या पालकांना देखील यात involve करू शकतात.

✳️ पालकांची माफी मागा.

स्वैराचार करणारा आहात म्हणून मनात पालकांची माफी मागा आणि थेरपिस्ट कडे जा. तुम्हाला फरक पडू लागला की मग पालकांना सांगा की की तुमची परवानगी न घेता त्यांना भेटलो पण आता मी चांगले फील करत आहे, यामुळे पालक सुद्धा सकारात्मक विचार करू शकतात.

✳️ शाळा, कॉलेज येथे समुपदेशक यांना भेटा.

सुरुवातीला कदाचित तज्ज्ञांकडे जाणे तुम्हाला जमणार नाही अश्यावेळी शाळा किंवा कॉलेज मधील समुपदेशक यांना विश्वासात घ्या आणि समस्या समजवा.

✳️ स्वतः कमवून थेरपी घ्या.

पार्ट time जॉब करून थेरपी साठीचे पैसे जमा करा आणि त्यातून तुमची थेरपी पूर्ण करा.

✳️ सपोर्ट ग्रुप, peer सपोर्ट, NGO यांची मदत घ्या.

काहीही झाले तरीही चुकूनही हार मानू नका, तुम्ही मानसिक त्रासात असणे deserve करत नाही. तुम्हाला देखील आनंदी राहायचा पूर्ण हक्क आहे, कदाचित तुमच्या पालकांना वेळ लागेल, कदाचित तुम्हाला एकट्याला लढाई लढावी लागेल पण त्यातून तुम्हाला सकारात्मक रिझल्ट मिळतील. प्रयत्न करणे हे आपले काम आहे आणि प्रयत्नांनी नेहमीच फळ मिळते.

कुठेही मदत लागली तर माझाशी संपर्क करा.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top